निसर्ग हा मानवाला मिळालेली सर्वात मोठी आणि अनमोल देणगी आहे. 'निसर्ग देवो भव' असे आपल्या संस्कृतीत मानले जाते. परंतु, आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा समतोल पार कोलमडून टाकला आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळे निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. म्हणूनच, आज 'पर्यावरण जतन' करणे ही केवळ हौस उरली नसून ती काळाची मोठी गरज बनली आहे.
आज आपल्याला जागोजागी सिमेंटची जंगले दिसतात, पण खरी हिरवी जंगले मात्र नष्ट होत चालली आहेत. वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ, अशा नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (जागतिक तापमान वाढ) पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे, ज्यामुळे हिमनद्या वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत आहे. जर आपण वेळीच सावध झालो नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्वासमोर मोठे संकट उभे राहील.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन'. 'एक मूल, एक झाड' ही संकल्पना आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून पर्यावरणाला पूरक अशा वस्तूंचा वापर वाढवला पाहिजे. पाणी आडवा, पाणी जिरवा यांसारख्या मोहिमा राबवून जलसाक्षरता निर्माण करणे आवश्यक आहे. हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, निसर्ग वाचला तरच मानव वाचेल. आपण निसर्गाचे मालक नसून त्याचे एक अविभाज्य घटक आहोत. आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सुंदर निसर्ग द्यायचा असेल, तर आजच पर्यावरणाची शपथ घेणे गरजेचे आहे. "पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा!" हा केवळ नारा न राहता ती आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा