आजच्या काळात चित्रपट हे केवळ अडीच-तीन तासांचे मनोरंजन उरलेले नाही, तर ते समाजाची मानसिकता घडवण्याचे आणि बिघडवण्याचे एक प्रभावी 'वैचारिक शस्त्र' बनले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर २' हा चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्याला मुख्य प्रवाहातील मीडियाकडून (Mainstream Media) होणारा विरोध पाहिल्यानंतर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले. एक शिक्षक म्हणून गेली १८ वर्षे समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे निरीक्षण करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीने 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या नावाखाली आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली कुटुंबव्यवस्था जाणीवपूर्वक कशी मोडीत काढली आहे. हा केवळ योगायोग नाही, तर हा एक अतिशय थंड डोक्याने राबवलेला अजेंडा आहे. याची काही ढळढळीत उदाहरणे पाहूया. १. खऱ्या इतिहासाची आणि सत्याची मोडतोड
समाजातील एका विशिष्ट वर्गाला सतत 'पीडित' दाखवून हिंदू-मुस्लिम किंवा जातीय तेढ निर्माण करण्यासाठी चित्रपटांनी खऱ्या घटना कशा सोयीस्कररीत्या बदलल्या आहेत, हे खालील उदाहरणांवरून स्पष्ट होते:
* चक दे! इंडिया (Chak De! India): या चित्रपटाची मूळ कथा भारताचे माजी हॉकीपटू मीर रंजन नेगी यांच्या जीवनावर आधारित होती. पण पडद्यावर त्यांना 'कबीर खान' बनवण्यात आले. केवळ एक मॅच हरल्यामुळे एका मुस्लिम खेळाडूला 'देशद्रोही' ठरवले गेले, असा खोटा नॅरेटिव्ह सेट करून बहुसंख्याक समाजाला सहिष्णुतेचे धडे देण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता.
* जय भीम (Jai Bhim): या बहुचर्चित चित्रपटातील मूळ सत्य घटनेत ज्या पोलीस अधिकाऱ्याने अन्याय केला होता, तो प्रत्यक्षात ख्रिश्चन होता. मात्र, चित्रपटात जाणीवपूर्वक त्या पात्राला 'हिंदू उच्चवर्णीय' दाखवण्यात आले. जातीय द्वेष पसरवण्यासाठी सत्याची किती क्रूरपणे हत्या केली जाते, हे यातून दिसते.
* वॉटर (Water): हा चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित होता, त्या मूळ कादंबरीत मुस्लिम समाजातील वास्तवाचे चित्रण होते. पण चित्रपटात मात्र हे सर्व 'हिंदू विधवांच्या' माथी मारण्यात आले आणि कहर म्हणजे त्या पात्रांची नावे 'राधा' आणि 'सीता' ठेवली गेली. आपल्या श्रद्धास्थानांचा यापेक्षा मोठा अपमान तो काय असू शकतो?
२. कुटुंबव्यवस्थेचा खून आणि 'उडाणटप्पू' नायकाचे उदात्तीकरण
९० च्या दशकानंतर भारतीय चित्रपटांनी एक अत्यंत घातक पायंडा पाडला. चित्रपटातील नायक हा काहीही कामधंदा न करणारा, 'आवारा' गर्दी करणारा दाखवला जातो.
मुलीचे आई-वडील अशा मुलाशी लग्न करण्यास साहजिकच नकार देतात. पण चित्रपट या आई-वडिलांनाच 'खलनायक' ठरवतो. मुलगी आपल्या जन्मदात्यांचा विरोध झुगारून त्या मुलाशी पळून जाते. इथपर्यंतच हे थांबत नाही, तर अनेक चित्रपटांत हा बेकार प्रियकर मुलीच्या वडिलांना किंवा भावाला बेदम मारहाण करतो, प्रसंगी त्यांचा खून करतो आणि तरीही ती 'सुशिक्षित' मुलगी आपल्या बापाच्या किंवा भावाच्या मारेकऱ्यासोबत हसत हसत लग्न करते. हे कसले प्रेम आणि हा कसला स्त्रीवाद? ही विकृती आपल्या तरुण पिढीच्या माथी मारून त्यांना स्वतःच्याच कुटुंबापासून तोडण्याचे काम हे चित्रपट करत आहेत.
३. स्त्रीवादाचा विपर्यास: 'कर्तव्य' म्हणजे शोषण आणि 'स्वैराचार' म्हणजे स्वातंत्र्य?
आजच्या तथाकथित आधुनिक चित्रपटांमधून 'स्त्रीवादा'चा (Feminism) जो अर्थ लावला जात आहे, तो भारतीय समाजव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. चित्रपटकर्त्यांनी 'स्त्री स्वातंत्र्य' या संकल्पनेचे जाणीवपूर्वक विद्रुपीकरण केले आहे.
कौटुंबिक स्त्रीचे 'शोषित' म्हणून चित्रण: जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी, मुलांसाठी आणि सासू-सासऱ्यांसाठी आनंदाने कष्ट करत असेल, घराला घरपण मिळवून देण्यासाठी स्वतःला झिजवत असेल, तर चित्रपटात तिचे चित्रण 'बिचारी', 'शोषित' किंवा 'पुरुषांची गुलाम' असे केले जाते. जणू काही कुटुंबासाठी राबणे हा गुन्हाच आहे, असा नॅरेटिव्ह सेट केला जातो.
भौतिक सुखाचे 'स्वातंत्र्य' म्हणून उदात्तीकरण: याउलट, जी स्त्री केवळ स्वतःच्या भौतिक सुखासाठी जगते, जिला घरच्या जबाबदाऱ्यांचे सोयरसुतक नाही, जी मद्यपान-धूम्रपान करणे किंवा अनैतिक संबंध ठेवणे यालाच 'प्रगती' मानते, तिला 'स्वतंत्र' आणि 'आधुनिक' म्हणून गौरवण्यात येते. स्वतःच्या सुखासाठी चालता बोलता संसार मोडणे म्हणजे 'स्वतःला शोधणे' (Finding herself) असे गोंडस नाव देऊन या स्वैराचाराचे समर्थन केले जाते.
'थप्पड' किंवा अलीकडच्या अनेक वेब सिरीजमधून हेच बिंबवण्याचा प्रयत्न होतोय की, जुळवून घेणे म्हणजे कमजोरी आणि तोडणे म्हणजे शक्ती. वास्तविक पाहता, भारतीय संस्कृतीत स्त्री ही 'शक्ती' मानली गेली आहे, जी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. पण बॉलीवूडला ही 'बांधून ठेवणारी शक्ती' नकोय, तर त्यांना स्वतःच्याच घराला आग लावणारी 'स्वैर वृत्ती' निर्माण करायची आहे. या छद्म-स्त्रीवादामुळे आज अनेक घरे उद्ध्वस्त होत आहेत आणि मुले पोरकी होत आहेत, याचे भान या चित्रपट निर्मात्यांना कधी येणार?
४. आध्यात्मिक मूल्यांचे खच्चीकरण
'भारतीय चित्रपटसृष्टीचा एक ठरलेला साचा म्हणजे कोणत्याही आध्यात्मिक व्यक्तीला, साधूला किंवा गुरूजींना 'बलात्कारी', 'ढोंगी' किंवा 'देशद्रोही' म्हणून दाखवणे. PK असो वा त्या धाटणीचे इतर चित्रपट, हिंदू धर्मातील प्रतीकांचे आणि श्रद्धास्थानांचे विद्रुपीकरण करणे हे या 'इको-सिस्टम'चे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. पण वास्तव हे आहे की; समाजात काही चुकीच्या प्रवृत्ती असतीलही, पण चित्रपटांत केवळ एकाच धर्माच्या आध्यात्मिक नेत्यांना लक्ष्य करणे, हा निव्वळ योगायोग नसून ती एक जाणीवपूर्वक केलेली 'वैचारिक दहशत' आहे.
५. चित्रपटांमधील शिक्षकांचे बदलते स्थान: ज्ञानाच्या पीठाचा पद्धतशीर उपहास
आपल्या भारतीय संस्कृतीत 'गुरु'ला ईश्वराचे स्थान दिले आहे, पण बॉलीवूडने गेली अनेक वर्षे जाणीवपूर्वक शिक्षकांचे केवळ विडंबनच केले आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, त्याची जाणीव या चित्रपटकर्त्यांना अजिबात नाही. चित्रपटांमध्ये शिक्षकाला नेहमीच एक 'विनोदाचे पात्र', 'मूर्ख' किंवा 'अति-कठोर खलनायक' म्हणून रंगवले जाते.याची काही ठळक उदाहरणे पाहूया:
- थ्री इडियट्स (3 Idiots): या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात 'व्हायरस' (वीरू सहस्त्रबुद्धे) या प्राचार्याला अत्यंत असंवेदनशील आणि विद्यार्थ्यांचा शत्रू असल्यासारखे दाखवले आहे. एवढेच नव्हे, तर चतुरच्या भाषणातील 'चमत्कार' शब्दाचा केलेला तो अश्लील बदल आणि त्यातून उडवली गेलेली सिस्टीमची व शिक्षकांची खिल्ली, प्रेक्षकांनी हसत हसत एन्जॉय केली. भर वर्गात शिक्षकांचा अपमान करणे किंवा त्यांना मूर्ख सिद्ध करणे म्हणजे 'कूल' असणे, असा अत्यंत घातक पायंडा यातून पडला.
- मै हूँ ना (Main Hoon Na): या चित्रपटात बोलताना सतत थुंकणारा (सतीश शाह यांचे पात्र) किंवा विसरभोळा शिक्षक दाखवून केवळ स्वस्त विनोद निर्मिती केली गेली. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व इतके हास्यास्पद दाखवले जाते की विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही आदर उरत नाही.
- स्टुडंट ऑफ द इयर (Student of the Year): यांसारख्या तथाकथित 'ग्लॅमरस' चित्रपटांमध्ये शाळा किंवा कॉलेज म्हणजे केवळ फॅशन शो, गाणी आणि रोमान्सचे अड्डे दाखवले जातात. तिथे शिक्षक म्हणजे केवळ एक शोभेची वस्तू असते.
जेव्हा चित्रपटांतील नायक भर वर्गात शिक्षकांची टर उडवतो किंवा 'शाळा' सारख्या चित्रपटांतून अभ्यासापेक्षा वयाला न शोभणाऱ्या गोष्टींचे उदात्तीकरण होते, तेव्हा खऱ्या आयुष्यातील विद्यार्थी त्याचे अनुकरण करू लागतात. शिक्षकाला आदराचे आणि मार्गदर्शकाचे स्थान देण्याऐवजी त्याला बावळट ठरवण्याचा हा अजेंडा आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या आणि पर्यायाने देशाच्या मुळावर घाव घालत आहे.
६. जेंडर प्रेशर आणि वैचारिक अजेंडा
आजकाल काही पाश्चात्य प्रभावाखालील चित्रपटांतून लहान मुलांच्या मनात त्यांच्या नैसर्गिक ओळखीबद्दल (Gender Identity) गोंधळ निर्माण केला जातो. "तुम्ही कोण आहात हे तुम्हीच ठरवा" या नावाखाली निसर्गाच्या नियमांविरुद्ध शिक्षण देणं किंवा तसे चित्रपट बनवणं हे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यात राष्ट्रासाठी काही करण्याची ऊर्मी निर्माण करण्याऐवजी, मुलांना केवळ 'स्वतःच्या शरीराचा आणि ओळखीचा विचार' करण्यात गुंतवून ठेवलं जातं
७. अपरिपक्व वयातील 'लौकिक' आकर्षणाचे उदात्तीकरण
सैराट,'शाळा' किंवा त्या धाटणीच्या चित्रपटांचा विचार केला असता यातील अनेक चित्रपट किशोरवयीन प्रेमाला 'निरागस' ठरवण्याच्या नादात अशा काही गोष्टींना प्रोत्साहन देतात ज्या त्या वयासाठी अयोग्य असतात. शालेय जीवनात अभ्यासावर आणि चारित्र्य निर्मितीवर भर देण्याऐवजी, केवळ 'आकर्षण' आणि 'नातेसंबंध' यांनाच जीवनाचं अंतिम ध्येय म्हणून दाखवलं जातं. जेव्हा स्क्रीनवर लहान मुले 'लैंगिक चाळे' किंवा प्रौढांसारखे वागताना दिसतात, तेव्हा खऱ्या जीवनातील विद्यार्थी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. विरोधाभास हा आहे की; जिथे मुलांनी विज्ञानातील प्रगती किंवा 'धुरंधर २' मधील 'बलिदान' यावर चर्चा करायला हवी, तिथे त्यांचे लक्ष अशा 'डिस्ट्रॅक्शन्स' कडे वळवले जाते.
८. 'बॉलीवूडचा हा काला नाग' कोणाला वाचवतोय?
जेव्हा पठाण, जवान किंवा एक था टायगर सारखे चित्रपट येतात, ज्यात शत्रूराष्ट्रांचे उदात्तीकरण असते, किंवा आपल्या राष्ट्राचे डिस्ट्रक्शन असते, तेव्हा आमचा मुख्य मीडिया त्यांना डोक्यावर घेतो. पण जेव्हा 'धुरंधर २' किंवा 'धुरंधर', RRR, बॉर्डर,सारखे राष्ट्रवादी चित्रपट येतात, जे आपल्या जवानांचे शौर्य आणि देशासाठीचे 'बलिदान' दाखवतात, तेव्हा हाच मीडिया त्यांना 'प्रोपागांडा' ठरवतो. चित्रपटातील तो 'काला नाग' केवळ पडद्यावर नाही, तर तो आपल्या यंत्रणेत आणि मीडियात बसला आहे, जो देशद्रोही विचारधारेचे रक्षण करत आहे.
जागे होण्याची वेळ!
आपल्याला 'नया भारत' घडवायचा असेल, तर आपल्या तरुणांना काय पाहायला द्यायचे, हे आपणच ठरवले पाहिजे. कुटुंबाला फाट्यावर मारणारे, अति-जातिवाद पसरवणारे आणि खोटा इतिहास मांडणारे चित्रपट आता आपण नाकारलेच पाहिजेत.
चला, आजच ठरवूया की, आपण आपल्या मुलांना खोटा इतिहास सांगणारा 'कबीर खान' दाखवणार की देशासाठी हसत हसत छातीवर गोळी झेलणारा 'हमजा'?
जय हिंद! जय महाराष्ट्र!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा