गुरुवार, ५ मार्च, २०२६

नाटिका: "अग्निकुंड" (स्वातंत्र्यवीर सावरकर विचारपुष्प)

(नाशिक कटाच्या आधीचा काळ - १९०५-०६ चा संदर्भ)
पार्श्वभूमी:
१९०५-०६ चा काळ. बंगालच्या फाळणीनंतर देशभरात असंतोषाची आग धुमसत होती. लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ‘इंडिया हाऊस’मधून क्रांतिकार्याची ज्योत पेटवली होती, तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून विनायक दामोदर सावरकर नावाच्या एका तेजस्वी तरुणाने ‘अभिनव भारत’ नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती. इंग्रज सरकार या गुप्त हालचालींमुळे सावध झाले होते. नाशिक, जे क्रांतिकार्याचे एक प्रमुख केंद्र बनत चालले होते, तिथे सरकारची करडी नजर होती. अशा तणावपूर्ण आणि धगधगत्या वातावरणात ही नाटिका घडते.
पात्र परिचय:
 * विनायक (सावरकर): २३वर्षांचा तेजस्वी तरुण. डोळ्यात स्वातंत्र्याची आग, वाणीत ओज आणि विचारात क्रांतीची दूरदृष्टी.
 * अनंत: भावनिक पण देशासाठी काहीही करण्याची तयारी असलेला तरुण. सावरकरांचा निकटचा मित्र.(अनंत लक्ष्मण कान्हेरे)
 * विठ्ठल : व्यावहारिक आणि काहीसा संशयी. त्याला क्रांतीचा मार्ग धोकादायक आणि अशक्य वाटतो.(विठ्ठलराव तात्या शिखरे)
 * शंकर: दूरदृष्टी असलेला आणि विचारवंत तरुण. त्याला केवळ राजकीय स्वातंत्र्य नको, तर सामाजिक क्रांतीही हवी आहे.(शंकर रामचंद्र सोहनी)
*नारायण: सावरकरांचे धाकटे बंधू
*मदनलाल धिंग्रा: सावरकरांचे लंडनमधील सर्वात जवळचे सहकारी 
*व्ही. व्ही. एस. अय्यर (V.V.S. Aiyar) हे सावरकरांचे लंडनमधील 'उजवा हात' मानले जाणारे कार्यकर्ते. ते स्वतः बॅरिस्टर होते.
 * पहाऱ्यावरील मुलगा (दत्तोपंत): १५-१६ वर्षांचा किशोरवयीन मुलगा, ज्याच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटली आहे.
निवेदक: "विसाव्या शतकाची पहाट! भारतमाता पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडत होती. पण याच अंधारात, नाशिकच्या गोदावरी तीरी एक तेजस्वी ठिणगी धगधगत होती. विनायक दामोदर सावरकर नावाच्या एका तरुणाने आपल्या मित्रांच्या सोबतीने 'मित्रमेळा' आणि 'अभिनव भारत'ची स्थापना केली. हा केवळ तरुणांचा गट नव्हता, तर ते एक धगधगतं अग्निकुंड होतं. जिथे देशभक्तीच्या आणाभाका घेतल्या जाणार होत्या. पाहुया, क्रांतीचं हे पहिलं पाऊल..."
(स्थळ: नाशिकजवळील एक जुना वाडा. रात्रीची वेळ. वाड्याभोवती किर्रर्र अंधार आणि रातकिड्यांचा आवाज. आत एका मोठ्या खोलीत, मध्यभागी असलेल्या एका जड लाकडी टेबलावर एकच कंदील मिणमिणत आहे. त्याचा पिवळसर प्रकाश खोलीत गूढ वातावरण निर्माण करत आहे. विनायक (सावरकर) एका खुर्चीवर बसले आहेत, त्यांचे डोळे कंदिलाच्या ज्योतीकडे लागलेले आहेत, जणू ते त्या ज्योतीत भविष्यातील क्रांतीची आग पाहत आहेत. त्यांचे तीन मित्र –अनंत, विठ्ठल आणि शंकर – त्यांच्यासमोर अस्वस्थपणे बसलेले आहेत. बाहेर वाड्याच्या फाटकाजवळ दत्तोपंत नावाचा एक तरुण हातात लाठी घेऊन सावधपणे पहारा देत आहे.)
अनंत: (अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारत) विनायक, बाहेर शांतता आहे, पण ती वादळापूर्वीची शांतता वाटते. शहरात पोलिसांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गुप्तहेरांची नजर आपल्या प्रत्येकावर आहे. अशा परिस्थितीत तू म्हणतोस, “भारत जागा होईल.” पण मला सांग, हा झोपलेला सिंह जागा कसा होणार? इंग्रजांनी त्याच्या पायात गुलामगिरीच्या साखळ्या इतक्या घट्ट बांधल्या आहेत की हालचाल करणंही मुश्कील झालं आहे.
सावरकर: (शांत पण दृढ आवाजात, नजर अजूनही ज्योतीवर) अनंत, सिंहाला त्याच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागते. तो विसरला आहे की तो जंगलाचा राजा आहे. हा देश केवळ भूमीचा तुकडा नाही, तर जिवंत इतिहास आहे. याच मातीत चाणक्याने एका सामान्य चंद्रगुप्ताला सम्राट बनवून परकीय आक्रमकांना बाहेर काढले. इथेच सम्राट विक्रमादित्याने ज्ञानाचा आणि शौर्याचा सुवर्णकाळ आणला. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने बलाढ्य मोगल सत्तेला आव्हान दिले, ती भूमी गुलाम कशी राहू शकेल? आपण आपला वारसा विसरलो, म्हणून आज गुलाम आहोत. ती जाणीव... ती ठिणगी आपल्याला टाकायची आहे.
(अचानक बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येतो. लक्ष्मण सावध होतो आणि दरवाजाजवळ येऊन हळूच टकटक करतो. आत बसलेले सर्वजण स्तब्ध होतात. सावरकर हातानेच त्याला शांत राहायची खूण करतात. काही क्षण भयाण शांततेत जातात. मग आवाज थांबतो.)
विठ्ठल: (घाबरलेल्या आवाजात) पाहिलंस? एक साधा आवाजही आपल्या काळजाचा ठोका चुकवतो. आणि तू म्हणतोस इंग्रजांविरुद्ध लढायचं? त्यांच्याकडे आधुनिक बंदुका, तोफा, प्रशिक्षित सैन्य आणि कायद्याचं कवच आहे. आपल्याकडे काय आहे? रिकामे हात आणि फक्त स्वप्नं! या रिकाम्या हातांनी साम्राज्याचा सूर्य कसा मावळणार?
सावरकर: (आता त्यांची नजर विठ्ठलवर खिळते. ते अचानक उठतात आणि टेबलावर मूठ आपटतात. कंदिलाची ज्योत थरथरते आणि खोलीतील सावल्या नाचू लागतात.) रिकामे हात? विठ्ठल, इतिहासातील सर्वात मोठी शस्त्रं रिकाम्या हातांनीच उचलली आहेत! शस्त्रं माणसाला हरवत नाहीत, हरवतं ते भ्याड मन! मला सांग, इटली मॅझिनी आणि गॅरिबॉल्डीच्या नेतृत्वात कसा स्वतंत्र झाला? अमेरिकेने ब्रिटिश साम्राज्याला गुडघे टेकायला कसे लावले? फ्रान्समध्ये क्रांतीची मशाल कशी पेटली?
(ते खोलीत आवेशात चालू लागतात. त्यांचा आवाज आता चढलेला असतो.)
सावरकर: (थांबून) फक्त एकाच मार्गाने – रक्ताने! स्वातंत्र्याची किंमत रक्त देऊनच चुकवावी लागते. स्वातंत्र्य म्हणजे मंदिरातील प्रसाद नाही, जो मागितल्यावर मिळेल. ते युद्धभूमीवर गाळलेल्या घामातून आणि सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून उगवते. ज्या दिवशी या देशातील तरुण आपल्या स्वातंत्र्यासाठी मरायला तयार होतील, त्या दिवशी इंग्रजांचं हे अवाढव्य साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळेल! आपण भीक मागत नाही आहोत, आपण आपला हक्क हिसकावून घेणार आहोत!
शंकर: (विचारपूर्वक) विनायक, तुझं म्हणणं मला पटतंय. आपण लढू, रक्त सांडू... आणि समजा आपण जिंकलो. इंग्रज इथून निघून गेले. पण त्यानंतर काय? पुन्हा मूठभर लोकांच्या हातात सत्ता जाईल. पुन्हा तेच शोषण, तीच विषमता. गोऱ्या इंग्रजांची जागा काळे इंग्रज घेतील. मग त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय?
सावरकर: (शंकरच्या खांद्यावर हात ठेवत, त्यांचा आवेश आता शांत झाला आहे, पण आवाजात दूरदृष्टी आहे) उत्तम प्रश्न, शंकरा. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्या क्रांतीचा आत्मा आहे. मला फक्त राजकीय स्वातंत्र्य नकोय. ज्या स्वराज्यात माझा देशबांधव जातीच्या नावाने पिचवला जाईल, जिथे स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जाईल, जिथे अंधश्रद्धेच्या नावाखाली माणसाचं माणूसपण हिरावलं जाईल, ते स्वराज्य माझ्यासाठी निरर्थक आहे.
(ते पुन्हा टेबलाजवळ येतात आणि कंदिलाच्या प्रकाशात त्यांचा चेहरा अधिकच तेजस्वी दिसतो.)
सावरकर: माझ्या स्वप्नातील भारत केवळ स्वतंत्र नसेल, तर तो एक प्रगत राष्ट्र असेल. तिथे लोकशाही असेल – म्हणजे प्रत्येकाला समान अधिकार. राजा आणि रंक कायद्यासमोर समान असतील. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन... सर्व एकाच भारतमातेची लेकरं असतील. ब्राह्मण-शूद्र हा भेद नष्ट होईल. विज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचेल. हीच आपली खरी लढाई आहे, शंकरा. दोन आघाड्यांवरची लढाई!
अनंत: (आश्चर्याने) दोन आघाड्या? म्हणजे एक इंग्रजांविरुद्ध आणि दुसरी आपल्याच समाजातील रूढी आणि परंपरांविरुद्ध?
सावरकर: हो! कारण परकीय गुलामगिरीपेक्षा जास्त धोकादायक असते ती मानसिक गुलामगिरी! जी आपल्याला आपल्याच माणसांचा द्वेष करायला शिकवते. जोपर्यंत आपण आपल्या समाजातील या विकृती नष्ट करत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. खरा देशभक्त तोच, जो एका हातात क्रांतीची तलवार उचलतो आणि दुसऱ्या हातात समाजसुधारणेची लेखणी!
अंक ३
(वेळ: काही आठवड्यांनंतरची दुपार. विनायक (सावरकर) एका जुन्या स्तंभाला टेकून उभे आहेत. त्यांच्या हातात एक जुने, जीर्ण झालेले हस्तलिखित आहे. अनंत, शंकर, नारायण आणि विठ्ठल त्यांच्यासोबत आहेत.)
विठ्ठल: (सावरकरांचे लंडनहून आलेले पत्र आणि हस्तलिखित वाचून) विनायकने तिथून हे क्रांतीचं वाङ्मय पाठवलं खरं, पण आजही माझं मन साशंक आहे
: विनायक, आज आपल्या आजूबाजूला पाहिलं की फक्त गुलामगिरीची साखळदंढ आणि लाचारी दिसते. आपण जो इतिहास वाचतो, तो आपल्याला हरलेला समाज म्हणून हिणवतो. अशा वातावरणात तू ज्या महान भारताच्या गप्पा मारतोस, त्या केवळ कल्पनाशक्ती आहेत की खरोखरच कधी आपण जगाचे नेतृत्व करत होतो? आपल्या गौरवशाली अस्तित्वाचा पुरावा काय?
सावरकर: (हस्तलिखितावरून नजर न हटवता, स्मितहास्य करत) केवळ कल्पनाशक्ती? विठ्ठल, तुला इथे आजची लाचारी दिसत आहे, पण मला इथे आपल्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. याच मातीने कधीकाळी आपल्या पूर्वजांचे पराक्रम पाहिले आहेत. याच खांबांनी संस्कृतमधील वेदांचे पठण ऐकले असेल. ही धूळ नाही, हा आपल्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे.
(ते हस्तलिखित बंद करतात आणि मित्रांकडे वळतात. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते.)
सावरकर: आपल्याला शाळेत शिकवले जाते की आपण नेहमीच गरीब, अज्ञानी आणि विभागलेले होतो. इंग्रजांनी येऊन आपल्याला 'सुसंस्कृत' बनवले. पण हे सर्वात मोठे असत्य आहे! ज्यावेळी युरोप अंधारयुगात चाचपडत होता, त्यावेळी आपल्या देशात नालंदा आणि तक्षशिलासारखी विद्यापीठे ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरवत होती. ज्यावेळी ते लोक धनुष्यबाण वापरत होते, त्यावेळी आपले आर्यभट्ट आणि भास्कराचार्य ग्रहांची गती मोजत होते.
शंकर: (उत्सुकतेने) म्हणजे, आपण विज्ञानात आणि ज्ञानात त्यांच्यापेक्षा खूप पुढे होतो?
सावरकर: (आवेशात) पुढे? अरे, आपण जगाचे गुरु होतो! याच भूमीत शून्याचा शोध लागला, ज्याशिवाय आजचे गणित आणि विज्ञान अपूर्ण आहे. याच देशाने जगाला योग आणि आयुर्वेद दिले. आपली जहाजे समुद्रावर राज्य करत होती आणि आपला व्यापार जगभर पसरला होता. लोक म्हणायचे, भारतात सोन्याचा धूर निघतो! तो सोन्याचा धूर आपल्या ज्ञानाचा, शौर्याचा आणि समृद्धीचा होता.
(ते काही क्षण थांबतात, त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे आणि सोबतच दुःखाचे भाव येतात.)
सावरकर: पण मग काय झाले? आपण आत्मविस्मृतीत बुडालो. आपण आपल्यातील शौर्य विसरलो, ज्ञान विसरलो. आपण जातीपातीत विभागलो गेलो आणि परकीय आक्रमकांनी याच गोष्टीचा फायदा घेतला. त्यांनी केवळ आपली संपत्ती लुटली नाही, तर आपला आत्मविश्वासही लुटला. त्यांनी आपल्याला आपल्याच इतिहासाची लाज वाटायला लावली.
अनंत: (दुःखी स्वरात) आणि आपण ते खरं मानत गेलो.
सावरकर: हो! आणि हीच आपली सर्वात मोठी हार आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो, तो आपलं भविष्य घडवू शकत नाही. म्हणून, आपली लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नाही, तर आपल्या आत्मसन्मानाच्या पुनरुत्थानासाठी आहे. आपल्याला त्या सोन्याच्या धुराची आठवण पुन्हा करून द्यायची आहे. आपल्याला या तरुणांना सांगायचं आहे की, तुम्ही भिकाऱ्यांची नाही, तर सम्राटांची आणि ऋषींची संतान आहात!
सावरकर: ज्या दिवशी या देशातील प्रत्येक तरुणाच्या मनात आपल्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान जागृत होईल, त्या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यापासून त्याला कोणीही रोखू शकणार नाही. आपण केवळ भूमीचा तुकडा परत मिळवण्यासाठी लढत नाही आहोत, तर आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला आणि गौरवाला पुन्हा जिवंत करण्यासाठी लढत आहोत.

(सर्व मित्र स्तब्ध होऊन ऐकत असतात.)
अनंत: (आवेशात) विनायक, इंग्रज 'फोडा आणि झोडा' ही नीती वापरत आहेत. ते मुसलमानांना आपल्याच देशबांधवांविरुद्ध भडकवत आहेत. बंगालच्या फाळणीमागे त्यांचा हाच कुटील डाव होता. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?
नारायण: (अनंतच्या सुरात सूर मिसळत) बरोबर आहे. अनेक मुसलमान नेते इंग्रजांच्या बाजूने बोलत आहेत. ते स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्यासोबत येतील का, याची मला शंका आहे.
सावरकर: (नकाशावरून नजर हटवून शांतपणे पण ठामपणे सर्वांकडे पाहतात) अनंत, नारायण, तुमचा राग आणि तुमची शंका स्वाभाविक आहे. इंग्रज हेच तर इच्छित आहेत. ते आपल्याला जाती-धर्मात विभागून आपली शक्ती कमी करत आहेत. पण मला सांगा, १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात बहादूर शाह जफर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे आणि मौलवी अहमदउल्ला शाह हे खांद्याला खांदा लावून लढले नव्हते का?
(क्षणभर शांतता पसरते. सावरकर पुढे बोलू लागतात.)
सावरकर: आपली लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, तर परकीय सत्तेविरुद्ध आहे. या भूमीवर राहणारा, या भूमीला आपली मातृभूमी मानणारा आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो आपला आहे. हिंदू आणि मुसलमान हे एकाच भारतमातेचे दोन हात आहेत.  जर हे हात एकमेकांशीच लढत राहिले, तर शत्रूला हरवणार कसे?
विठ्ठल: पण विनायक, इतिहासात आपल्यात अनेक संघर्ष झाले आहेत. त्या कटू आठवणी इतक्या सहज विसरता येतील का?
सावरकर: (विठ्ठलजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतात) विठ्ठल, इतिहास हा शिकण्यासाठी असतो, जखमा कुरवाळत बसण्यासाठी नाही. होय, संघर्ष झाले. पण त्याच इतिहासात कबीराने आपल्याला एकतेचा संदेश दिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात इब्राहिम खान सारखे शूर सेनानी होते, हे आपण विसरायचे का? आपला शत्रू आपला भूतकाळ नाही, तर आपली वर्तमान गुलामगिरी आहे.
(सावरकर मध्यभागी येतात. त्यांचा आवाज अधिक दृढ होतो.)
सावरकर: माझ्या स्वप्नातील स्वतंत्र भारतात कोणताही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसेल. प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असेल, पण राष्ट्रापेक्षा कोणीही मोठे नसेल. आपली पहिली ओळख 'भारतीय' हीच असेल आणि शेवटची ओळखही 'भारतीय' हीच असेल. ज्या दिवशी हिंदू आणि मुसलमान 'आपण आधी भारतीय आहोत' हा विचार स्वीकारतील, त्या दिवशी इंग्रजांना या देशात एक क्षणही थांबता येणार नाही. आपल्याला मंदिरे आणि मशिदी दोन्ही वाचवायच्या आहेत, पण त्याआधी आपल्याला आपला देश वाचवायचा आहे.
शंकर: (प्रभावीत होऊन) म्हणजे, धार्मिक अस्मिता महत्त्वाची आहे, पण राष्ट्रीय अस्मिता सर्वश्रेष्ठ आहे.
सावरकर: अगदी बरोबर, शंकरा! ज्याप्रमाणे नदीचे पाणी समुद्रात मिळून एकरूप होते, त्याप्रमाणे आपल्या सर्व धार्मिक आणि सामाजिक अस्मिता या 'राष्ट्र' नावाच्या महासागरात विलीन झाल्या पाहिजेत. तेव्हाच आपण एक अजेय राष्ट्र बनू. म्हणूनच, आपल्या संघटनेत कोणताही भेद नसेल. इथे फक्त देशभक्त असतील.
(सर्व तरुण एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या मनातील शंका दूर होऊन एक नवीन विचार आणि ऐक्याची भावना जागृत होते.)
सावरकर: मित्रांनो, आज या कंदिलाच्या साक्षीने आपण शपथ घ्यायची आहे. ही शपथ केवळ स्वातंत्र्याची नसेल, तर ती समतेचीही असेल. आपण स्वातंत्र्यासाठी लढू, समाजातील अन्यायाविरुद्ध लढू, आणि वेळ पडल्यास या मातृभूमीसाठी हसत हसत आपले प्राण अर्पण करू! बोला, तयार आहात?
(सावरकरांच्या शब्दांनी वातावरणात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. विठ्ठलच्या चेहऱ्यावरचा संभ्रम नाहीसा होऊन तिथे आता निश्चयाचे भाव येतात. तो उठून उभा राहतो.)
अनंत: (डोळ्यात एक नवी चमक) विनायक, मी आजवर शंका घेत होतो. पण आज माझ्या मनातील सर्व अंधार दूर झाला. या क्षणापासून माझा प्रत्येक श्वास या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी असेल. आता मागे फिरणार नाही!
शंकर: (उत्साहाने) आणि स्वराज्य आल्यावर आपण एक असा ‘नवभारत’ घडवू, ज्याचा पाया शिक्षण, विज्ञान आणि समानता असेल! जिथे प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता येईल.
विठ्ठल: (मुठ आवळून) आपण इतिहास पुन्हा लिहू – गुलामांचा रडका इतिहास नव्हे, तर स्वातंत्र्यवीरांचा शौर्याचा इतिहास!
सावरकर: (आपला उजवा हात पुढे करत) तर मग, माझ्यासोबत शपथ घ्या!
(सर्व मित्र आपला हात सावरकरांच्या हातावर ठेवतात. ते सर्वजण एका अग्निकुंडाप्रमाणे दिसतात.)
सावरकर: (आवाज घुमतो) आम्ही ‘अभिनव भारत’चे सैनिक शपथ घेतो की, जोपर्यंत या देशाच्या भूमीवरून शेवटचा इंग्रज निघून जात नाही आणि जोपर्यंत या देशात समता आणि न्यायावर आधारित स्वराज्य स्थापित होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही!
(अचानक बाहेरून लक्ष्मण धावत येतो.)
दत्तोपंत: (धापा टाकत) विनायकदादा, पोलीस येत आहेत! कोणीतरी फितुरी केली आहे!
(क्षणभर सगळे स्तब्ध होतात. पण सावरकरांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नसतो.)
सावरकर: (शांतपणे) घाबरू नका. ही तर संघर्षाची सुरुवात आहे. रक्ताचं बलिदान होईल, तुरुंगाच्या अंधारकोठड्या आपलं स्वागत करतील, पण लक्षात ठेवा, त्या भिंतींवरही लिहिलं जाईल – “स्वातंत्र्य आमचं अंतिम ध्येय आहे!” चला, आता कामाला लागा.
(ते एका क्षणात कागदपत्रे आणि महत्त्वाच्या वस्तू लपवू लागतात. त्यांच्या हालचालीत कोणतीही गडबड नसते, तर एक प्रकारचा निश्चय असतो. बाहेर पोलिसांच्या बुटांचे आणि ओरडण्याचे आवाज जवळ येऊ लागतात. सर्व मित्र एकमेकांकडे पाहतात, त्यांच्या डोळ्यात भीती नाही, तर एक दृढ संकल्प दिसतो. बाहेरून “वंदे मातरम्”चा अस्पष्ट जयघोष ऐकू येतो.)
(पडदा पडतो.)
प्रसंग: लंडन - 'इंडिया हाऊस'मधील रणधुमाळी
(स्थळ: लंडनमधील 'इंडिया हाऊस'चा दिवाणखाना. भिंतीवर भारताचा नकाशा आणि मेझिनीचे चित्र आहे. सावरकर एका टेबलावर बसून '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाची हस्तलिखिते तपासत आहेत. लंडनमध्ये शिकणारे काही भारतीय विद्यार्थी त्यांच्याभोवती जमले आहेत. वातावरणात प्रचंड उत्साह आणि गुप्तता आहे.)
मदनलाल: विनायक, ब्रिटिश गुप्तहेरांनी आपल्या घरावर पाळत ठेवली आहे. ते म्हणतात की आपण इथे फक्त अभ्यास करायला आलो आहोत, मग हे '१८५७' वरचे पुस्तक कशासाठी?
सावरकर: (शांतपणे डोके वर काढून) मदनलाल, त्यांना वाटतं की १८५७ हे फक्त शिपायांचं बंड होतं. पण आपल्याला जगाला सांगायचं आहे की, ते भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं! हे पुस्तक केवळ इतिहास नाही, तर येणाऱ्या क्रांतीची गीता आहे. ज्या दिवशी हा ग्रंथ भारतात पोहोचेल, त्या दिवशी प्रत्येक तरुणाच्या हातात लेखणीच्या जागी तलवार असेल.
(तेवढ्यात 'अभिनव भारत'चा एक कार्यकर्ता अय्यर धावत येतो आणि सावरकरांच्या हातात एक छोटे पार्सल देतो.)
अय्यर : विनायक, पॅरिसहून निरोप आला आहे. 'पिस्तुलं' तयार आहेत आणि बॉम्ब बनवण्याची ती पुस्तिकाही (Bomb Manual) सुरक्षितपणे पोहोचली आहे.
सावरकर: (डोळ्यात चमक येते) उत्तम! आता हे साहित्य पुस्तकांच्या खोक्यांमधून भारतात पाठवायचे आहे. जे इंग्रज म्हणतात की आम्ही 'सुसंस्कृत' आहोत, त्यांना दाखवून देऊ की आमची बुद्धी केवळ शास्त्रच नाही, तर शस्त्रही घडवू शकते.
अय्यर : पण विनायक, आपण इथे परक्या देशात आहोत. जर पकडले गेलो तर बॅरिस्टरची पदवी जाईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल.
सावरकर: (उठून उभे राहतात, आवाजात ओज आहे) पदवी? अरे, मातृभूमीच्या पायातल्या साखळ्या तोडण्यापेक्षा मोठी कोणती पदवी असू शकते? आपण इथे बॅरिस्टर व्हायला नाही, तर ब्रिटिश साम्राज्याच्या छाताडावर नाचायला आलो आहोत! लक्षात ठेवा, ज्या 'लंडन'मधून हे जग चालतं, त्याच लंडनच्या छाताडावर बसून आपण क्रांतीचं रणशिंग फुंकत आहोत.
(सावरकर मदनलाल धिंग्राच्या खांद्यावर हात ठेवतात.)
सावरकर: मदनलाल, हे युद्ध केवळ शब्दांचे नाही. लवकरच आपल्याला जगाला दाखवावे लागेल की भारतीय तरुण केवळ बोलत नाही, तर तो कृतीही करतो. बलिदानाची वेळ जवळ आली आहे.
मदनलाल: (निश्चयाने) मी तयार आहे, विनायक!
सावरकर: (सर्वांना उद्देशून) चला, हे हस्तलिखित पूर्ण करायचे आहे. इथून सुटलेली विचारांची ही ठिणगी भारतात जाऊन पूर्ण साम्राज्याला भस्मसात करेल!
(पार्श्वभूमीला 'वंदे मातरम्'चे संगीत जोरात सुरू होते. सावरकर पुन्हा लेखनाकडे वळतात आणि इतर विद्यार्थी कामाला लागतात.)
निवेदक: "१३ मार्च १९१०! लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर सावरकरांच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या. जॅक्सन हत्येचा आरोप आणि मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या युद्धाबद्दल त्यांना 'एस.एस. मोरिया' जहाजावरून भारताकडे रवाना करण्यात आले.
इंग्रजांना वाटले वाघ जेरबंद झाला, पण ८ जुलै १९१० ची ती पहाट एका जागतिक चमत्काराची साक्ष देणार होती! जहाज फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर उभे होते. सावरकरांनी पहाऱ्याची नजर चुकवून संडासाच्या झरोक्यातून बाहेर झेप घेतली!
(पाण्यात उडी मारल्याचा जोरात आवाज – 'छपाक'!)
बेड्यांच्या वजनासह सावरकर मृत्यूच्या लाटा कापत पोहू लागले. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला, पण मृत्यूलाही थुंकून सावरकर फ्रान्सच्या भूमीवर पोहोचले. सावरकरांची ही एक उडी केवळ पराक्रम नव्हता, तर ते ब्रिटिश साम्राज्याला दिलेले जागतिक आव्हान होते!"
(पार्श्वभूमीला 'वंदे मातरम्'ची धून उंचावते आणि निवेदक अंधारात विलीन होतो.)

¹
प्रसंग: अंदमानची काळकोठडी (उपसंहार)
(स्थळ: अंदमानचा सेल्युलर जेल. वेळ: रात्रीची वेळ. मंचावर अंधार आहे, फक्त एका कोपऱ्यात मंद प्रकाश पडतोय. सावरकर (आता वय ३०-३२) अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत, अंगावर जेलचे जाड भरड कपडे, हातापायात बेड्या आहेत. त्यांच्या हातातील लेखणी हिरावून घेतली आहे, पण ते भिंतीवर दगडाच्या तुकड्याने काहीतरी कोरत आहेत.)
सावरकर: (स्वतःशीच, शांत पण निश्चयी आवाजात) विठ्ठल म्हणाला होता, हे रिकामे हात काय करणार? विठ्ठल, आज माझे हात बेड्यांत आहेत, लेखणी हिसकावून घेतली आहे... पण या कोठडीच्या भिंतीच आता माझे कागद बनले आहेत.
(ते भिंतीवर काहीतरी कोरतात. लांबून कोणाचे तरी ओरडण्याचे आणि कोड्याचे फटके मारण्याचे आवाज येतात.)
सावरकर: (प्रेक्षकांकडे वळून) क्रांतीचा मार्ग फुलांचा नसतो, हे आम्हाला ठाऊक होतं. पण अंदमानच्या या भिंतींनाही माहिती नाही की, विचार कधीच कैद करता येत नाहीत. शरीराला जखमा होतील, पण आत्म्याला कोण बांधणार?
(त्यांच्या चेहऱ्यावर वेदना असूनही एक स्मितहास्य येते.)
सावरकर: बाहेर माझे मित्र, माझे अभिनव भारतचे सैनिक लढत असतील. कोणाला फाशी मिळेल, कोणाला जन्मठेप... पण या रक्ताच्या अर्घ्यातूनच उद्याचा स्वतंत्र भारत जन्माला येईल. मृत्यूचं भय दाखवून जे आम्हाला रोखू पाहत आहेत, त्यांना ठाऊक नाही... की आम्ही मृत्यूला आधीच जिंकलं आहे!
(ते पुन्हा भिंतीवर कविता कोरू लागतात. पार्श्वभूमीला नाशिकच्या त्या वाड्यातील मित्रांचे "वंदे मातरम्" चे आवाज गुंजू लागतात.)
सावरकर: (जोरात) "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..."
(प्रकाश हळूहळू कमी होतो आणि पडदा पडतो.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नाटिका: "अग्निकुंड" (स्वातंत्र्यवीर सावरकर विचारपुष्प)

( नाशिक कटाच्या आधीचा काळ - १९०५-०६ चा संदर्भ) पार्श्वभूमी: १९०५-०६ चा काळ. बंगालच्या फाळणीनंतर देशभरात असंतोषाची आग धुमसत होती....