आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मूल जन्माला आल्यापासूनच पालकांची धावपळ सुरू होते. 'चांगली शाळा म्हणजेच महागडी इंग्रजी माध्यमाची शाळा' या भ्रमात आज अनेक पालक अडकले आहेत. परंतु, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अहवाल, मानवी मानसशास्त्र, पालकांची बदलती मानसिकता आणि स्पर्धा परीक्षांचे वास्तव काही वेगळेच सांगते.
जर मुलाला भविष्यात NEET, JEE किंवा इतर कठीण स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी करायचे असेल, तर अंगणवाडीपासूनच इंग्रजी माध्यमाचे ओझे लादण्याऐवजी एक अत्यंत व्यावहारिक, मानसशास्त्रीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असा 'रोडमॅप' आखणे गरजेचे आहे. याविषयीचा एक सखोल आणि मार्गदर्शक वैचारिक चिंतन खालील प्रमाणे.
कोणतीही स्पर्धा परीक्षा, मग ती NEET असो वा JEE, ती विद्यार्थ्यांच्या केवळ ज्ञानाची परीक्षा घेत नाही, तर त्यांच्या 'ॲप्लिकेशन स्किल्स' (उपयोजन कौशल्य) आणि 'प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी' (समस्या निवारण क्षमता) ची परीक्षा घेते. लहान वयात जेव्हा मुलाची स्वतःची मातृभाषा विकसित होत असते, तेव्हाच त्याच्यावर इंग्रजीसारख्या परकीय भाषेचे ओझे लादले जाते. यामुळे मूल संकल्पना समजून घेण्याऐवजी ती भाषा समजून घेण्यातच आपली ऊर्जा खर्च करते. भाषा नीट न समजल्यामुळे मुले उत्तरे पाठ करू लागतात. ही पाठांतराची सवय इयत्ता १० वी पर्यंत त्यांना चांगले गुण मिळवून देऊ शकते, मात्र जेव्हा ही मुले ११ वी आणि १२ वी मध्ये खऱ्या विज्ञान आणि गणिताचा सामना करतात, तेव्हा हा पाठांतराचा पोकळ पाया कोसळतो. परिणामत: NEET किंवा JEE सारख्या परीक्षांमध्ये फिरवून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाठांतराच्या जोरावर देता येत नाहीत. परिणामी, हुशार समजली जाणारी मुलेही अपयशी ठरतात, डिमोटिव्हेट होतात आणि त्यांचे मोठे शैक्षणिक व मानसिक नुकसान होते.
आजच्या काळात पालकांच्या शैक्षणिक निवडींमागे केवळ मुलांचे शिक्षण नसते, तर त्यामागे एक तीव्र मानसशास्त्रीय दबाव कार्य करत असतो. सध्याच्या काळात बहुतांश कुटुंबांमध्ये 'एकच मूल' (Single Child) असण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे साहजिकच पालकांची आपल्या पाल्याबद्दलची काळजी आणि त्यांच्या भविष्यातील भावनिक गुंतवणूक कमालीची वाढली आहे. "माझ्या मुलाच्या भविष्याबाबत मी कोणतीही रिस्क घेणार नाही," हा पालकांचा ठाम निर्धार असतो. या भीतीपोटी ते बाजारात उपलब्ध असलेले सर्वात महागडे पर्याय निवडतात. त्यांना वाटते की कमी फीच्या शाळेत टाकणे म्हणजे मुलाच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे. तसेच पालकांच्या मनात एक सुप्त आणि अत्यंत संवेदनशील भीती असते: "उद्या जर माझा मुलगा किंवा मुलगी अपयशी ठरली, तर 'आम्ही पैशाअभावी त्याला/तिला मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा इंग्रजी शाळेत टाकले नाही' अशी अपराधीपणाची भावना (Financial Guilt) आम्हाला आयुष्यभर छळेल का?" पालकांना स्वतःला कधीही दोष द्यायचा नसतो.
पालकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पाल्याबद्दलची ही काळजी अत्यंत वाजवी असली, तरी महागडी फी भरणे म्हणजे यशाची गॅरंटी नव्हे. पालकांचा हाच भावनिक कमकुवतपणा ओळखून आज अनेक शाळांचे बाजारीकरण झाले आहे. आपल्या पाल्याला सुरक्षित ठेवण्याच्या नादात आपण त्याच्या वैचारिक वाढीची 'रिस्क' घेत आहोत, हे पालकांनी ओळखले पाहिजे.
मानसोपचारतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मते, बालकाचा मेंदू हा सुरुवातीच्या वर्षांत अत्यंत संवेदनशील असतो. युनेस्कोच्या (UNESCO) एका प्रसिद्ध अहवालानुसार, "प्राथमिक शिक्षण जर मातृभाषेतून दिले गेले, तर मुलांचा संज्ञानात्मक विकास (Cognitive Development) अत्यंत वेगाने होतो."
मातृभाषेत शिकताना मूल केवळ ऐकत नाही, तर ते त्यावर विचार करू लागते. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर स्वतःचे तर्क लावू शकते. यालाच 'थॉट प्रोसेस' (Thought Process) म्हणतात. जेव्हा मूल स्वतःच्या भाषेत शिकते, तेव्हा त्याच्यावर कोणताही मानसिक ताण नसतो. त्याला शाळेत जाणे आणि नवीन गोष्टी शिकणे हा एक आनंददायी अनुभव वाटू लागतो.
शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा नियम असा आहे की, कन्टेन्ट (माहिती किंवा अभ्यासक्रम) कधीही शिकता येतो, पण थॉट प्रोसेस (विचार करण्याची पद्धत) एकदा फसली की ती पुन्हा सुधारणे अत्यंत कठीण असते. जे विद्यार्थी प्राथमिक वर्गात 'अभ्यास कसा करावा' आणि 'संकल्पना कशी समजून घ्यावी' हे पद्धतशीरपणे शिकतात, ते इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा नवीन भाषेत सहज यशस्वी होऊ शकतात.
सध्या गल्लीबोळांत सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणापेक्षा 'मार्केटिंग'वर जास्त भर दिला जातो. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, महागडे गॅदरिंग, आंतरराष्ट्रीय दर्जाचे भासवणारे पण प्रत्यक्षात निरुपयोग असणारे प्रोजेक्ट्स यांवर मोठा खर्च केला जातो. हा खर्च पालकांच्या खिशातूनच वसूल केला जातो. शाळांसाठी ही एक प्रकारची व्यावसायिक जाहिरात असते, ज्याचा विद्यार्थ्यांच्या मूळ वैचारिक क्षमतेशी किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीशी काहीही संबंध नसतो. ज्युनिअर केजीपासून १० वी पर्यंत इंग्रजी शाळेची फी, बसचा खर्च, प्रोजेक्ट्सचा खर्च मिळून लाखो रुपये खर्च होतात. हा पैसा पालकांच्या बचतीवर मोठा ताण आणतो, जो वास्तविक पुढे कामाला येऊ शकतो.
अनेक पालकांचा असा गैरसमज असतो की सरकारी किंवा कमी फी असलेल्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षक नसतात. परंतु वास्तव याउलट आहे. सरकारी किंवा अनुदानित शाळांमधील शिक्षकांची निवड ही TET, TAIT किंवा कडक स्पर्धा परीक्षांमधून आणि मुलाखतींमधून होते. हे शिक्षक डी.एड., बी.एड., एम.ए., एम.एस्सी. सारख्या पदव्यांचे धारक असतात आणि त्यांना बालमानसशास्त्राचे अधिकृत प्रशिक्षण मिळालेले असते. याउलट, अनेक खाजगी इंग्रजी शाळांमध्ये अतिशय कमी पगारावर, अप्रशिक्षित शिक्षकांकडून काम करून घेतले जाते. सरकारी शाळांसमोर सध्या अशैक्षणिक कामांचा ताण किंवा काही ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता यासारख्या समस्या आहेत, हे नाकारता येणार नाही. परंतु, सुज्ञ पालकांनी येथे 'मध्यम मार्ग' काढणे गरजेचे आहे. शाळेत मिळणाऱ्या दर्जेदार आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घेत असतानाच, पालकांनी घरी मुलांच्या अभ्यासाकडे थोडे वैयक्तिक लक्ष दिले किंवा काही कमतरता भासल्यास स्थानिक पातळीवर पूरक मदत घेतली, तर मुलांचा पाया अत्यंत भक्कम होतो.
करिअरचा अचूक आणि व्यावहारिक रोडमॅप (The Winning Strategy)
मुलाला वैद्यकीय (Medical) किंवा अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात पाठवण्यासाठी खालील तीन टप्प्यांचे धोरण अत्यंत यशस्वी ठरू शकते:
टप्पा १: अंगणवाडी ते इयत्ता ८ वी (किंवा १० वी पर्यंत)
या काळात विद्यार्थ्याला जवळच्या, चांगल्या, कमी खर्चिक किंवा सरकारी/अनुदानित शाळेत घालावे. (शक्यतो मातृभाषा किंवा सेमी इंग्रजी माध्यम निवडावे). याचा फायदा म्हणजे मुलावर भाषेचे ओझे नसल्याने गणित आणि विज्ञान या विषयांच्या मूळ संकल्पना (Concepts) अगदी स्पष्ट होतात. मूल प्रश्न विचारायला शिकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पालकांचे लाखो रुपये सुरक्षित राहतात.
टप्पा २: इयत्ता ९ वी आणि १० वी
या टप्प्यावर मुलाची बुद्धिमत्ता आणि आवड ओळखून त्याला सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी भाषेतील वैज्ञानिक शब्दांची (Scientific Terms) ओळख करून द्यावी. याचा फायदा म्हणजे जर मूल हुशार असेल, तर या दोन वर्षांत त्याला शालेय अभ्यासासोबतच NEET/JEE च्या फाउंडेशन (Foundation) कोर्सेसची ओळख करून देता येते. जर मूल अत्यंत हुशार असेल, तर फक्त ११ वी १२ वी मध्येच चांगल्या अकॅडमीत प्रवेश दिला तरी चालतो.
टप्पा ३: इयत्ता ११ वी आणि १२ वी
हा करिअरचा खरा टर्निंग पॉईंट आहे. या काळात मुलाला एखाद्या चांगल्या, नामांकित कोचिंग अकॅडमी किंवा किंवा दर्जेदार कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्यावा. प्राथमिक शिक्षणात जे लाखो रुपये वाचवले होते, ते आता ११ वी १२ वी च्या महागड्या फीसाठी, चांगल्या हॉस्टेलसाठी आणि दर्जेदार स्टडी मटेरियलसाठी न डगमगता खर्च करता येतात. यामुळे पालकांवर कर्ज काढण्याची वेळ येत नाही आणि "आम्ही पैशाअभावी मागे पडलो" ही जी पालकांची भीती असते, ती कायमची दूर होते; कारण त्यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसा खर्च केलेला असतो.
'लर्निंग टू लर्न' (Learning to Learn) यशाची खरी गुरुकिल्ली
जे विद्यार्थी प्राथमिक स्तरावर स्वतः विचार करायला शिकतात, स्वतःच्या चुकांमधून शिकतात आणि विषयाचा गाभा समजून घेतात, त्यांना 'लर्निंग टू लर्न' (कसे शिकावे हे शिकणे) हे कौशल्य आत्मसात होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) देखील याच मुद्द्यावर भर देते की, पोपटपंची करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा 'क्रिटिकल थिंकिंग' (चिकीत्सक विचार) करणारे विद्यार्थी भविष्यातील भारताची गरज आहेत. अशी वैचारिक प्रवृत्ती निर्माण झालेला विद्यार्थी केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच नव्हे, तर यूपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC), संशोधन (Research) किंवा कॉर्पोरेट जगतातही अभूतपूर्व यश संपादन करू शकतो.
थोडक्यात सांगायचे तर, मुलांचे करिअर ही एक मॅरेथॉन (दीर्घ पल्ल्याची) शर्यत आहे, शंभर मीटरची धावण्याची स्पर्धा नाही. शर्यतीच्या सुरुवातीलाच (म्हणजेच प्राथमिक वर्गात) इंग्रजी माध्यमाच्या आणि महागड्या फीच्या नावाखाली पालकांचा खिसा आणि मुलांचा मेंदू थकवून टाकणे अत्यंत चुकीचे आहे. पालकांची आपल्या एकुलत्या एका मुलाबद्दलची काळजी आणि भावनिक गुंतवणूक नक्कीच समजण्यासारखी आहे. परंतु, ही काळजी चुकीच्या जागी पैसा खर्च करून नाही, तर योग्य नियोजनातून व्यक्त झाली पाहिजे. सुरुवातीला कमी खर्चाच्या, दर्जेदार आणि मातृभाषेतील शाळेत मुलांचा 'थॉट प्रोसेस'चा पाया पक्का करणे आणि वाचलेला संपूर्ण पैसा अंतिम टप्प्यात (११ वी १२ वी मध्ये) पूर्ण ताकदीने लावणे, हाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि पालकांच्या आर्थिक व मानसिक शांततेचा सर्वात खात्रीशीर 'राजमार्ग' आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा